नवरात्री म्हणले कि सगळ्यांना वेध लागतात ते नऊ रंगांचे, देवीच्या आराधनेचे आणि लोकप्रिय नृत्याप्रकार गरब्याचे. नृत्यप्रकारातून देवीच्या सेवेत भक्ति रुजू करण्याचा प्रकार म्हणजे गरबा. मूळचा गुजरातचा पण आता देशभरात लोकप्रिय असलेला प्रकार नवरात्रीचे खास आकर्षण असतो. गुजरातमध्ये नवरात्रीत तसेच आनंदाच्या प्रत्येक क्षणी गरबा केला जातो.
शारीरिक क्षमतेचा कस लावणाऱ्या या नृत्यप्रकाराचा मूळ अर्थ मात्र अतिशय वेगळा आहे. गरबा किंवा गरबो याचा अर्थ प्रजनन, पुनरुत्पादन साजरं करणं असा आहे. थोडक्यात स्त्रीत्वाचा सन्मान करणं हा या नृत्यप्रकाराचा मूळ हेतू आहे. संस्कृत शब्द गरभ (गर्भ ) वरून गरबा हा शब्द घेतला आहे. पुरुष या नृत्यप्रकारात सहकारी म्हणून असले तरी मुख्यत्वे स्त्रिया यात मुख्य भाग असतात.
पूर्वी मुलगी वयात आल्यावर किंवा तिच्या विवाहाप्रसंगी अनेकदा गरबा केला जायचा. या शिवाय देवीच्या उत्सवाचे 9 दिवसही गरबा केला जातो.
स्त्री पुरुषांच्या जोड्या गोल रिंगण करून उभ्या असतात. हे रिंगण जीवनचक्राचे प्रतीक समजले जाते. यांच्या मध्यभागी राक्षसाचा वध करणाऱ्या देवीची प्रतिमा असते. यासोबतच दांडिया ही केला जातो. जो देवीच्या युद्ध आयुधांच प्रतीक समजला जातो.